Life Imprisonment : पेट्रोल टाकून महिलेला पेटवून दिल्या प्रकरणी दोघांना जन्मठेप

    163

    नगर : पेट्रोल (petrol) टाकून महिलेला पेटवून देऊन तिची हत्या केल्या प्रकरणी दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप (Life Imprisonment) व दंडाची शिक्षा सुनावली आहे. अविनाश साजिद काळे व साजिद जाकीट काळे (दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. पारनेर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राऊत यांनी काम पाहिले. 

    पाच वर्षांपूर्वी म्हणजेच १७ सप्टेंबर २०१८ला रितेश सुभाष भोसले व त्यांची पत्नी करिश्मा हे त्यांच्या दोन लहान मुलांसह निघोज (ता. पारनेर) येथे करिश्माच्या वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. करिश्माच्या आई व वडिलांना भेटल्यानंतर रितेश भोसले हे दोन्ही मुलांना घेऊन माझमपूर राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथे आले. तर करिश्मा आई-वडिलांच्या घरी मुक्कामी राहिली होती. १८ सप्टेंबर २०१८ला रात्री १ वाजता करिश्माचा भाऊ प्रवीण नरेश काळे यांचा रितेशला फोन आला की, साजिद काळे व अविनाश काळे यांनी करिश्माला विनाकारण शिवीगाळ केली तसेच धमकी देत करिश्माच्या अंगावर पेट्रोल  टाकून तिला पेटवून दिले. तिला उपचारासाठी नगरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान करिश्माचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी करिश्माने पोलिसांना जबाब दिला होता. या प्रकरणी रितेश भोसलेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक आर.डी. पवार व सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार बोथरे यांनी गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

    सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच, तपासी अधिकारी, मृत्युपूर्व जबाब व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here