
नगर : उत्तर नगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी (Shirdi) येथे अपर जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयाचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाशंकर आदी उपस्थित हाेते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, ”उत्तर नगर जनतेसाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी उपयुक्तता आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक, अडचणी दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे. महसूल विभागाच्या बहुतांश सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत-कमी मानवी हस्तक्षेप शिवाय पारदर्शक कारभार करण्यावर महसूल विभागाचा भर आहे.”





