
कर्जत : दहा दिवसांपासून चौंडी (ता.जामखेड) येथील धनगर (Dhangar) समाजाच्या उपोषणाची राज्य सरकारने (State Govt) दखल घेतली नाही. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आजचा चौंडी दौरा रद्द केला. याच्या निषेधार्थ नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चापडगाव (ता.कर्जत) येथे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध करण्यात आला. यावेळी राज्य सरकार आणि पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत वेळीच दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
चौंडी (ता.जामखेड) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. सदरच्या उपोषणास महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा वाढत आहे.
मात्र, राज्य सरकारने अद्याप या उपोषणाबाबत कसलीही गंभीर दखल घेतली नाही. तसेच उपोषणाचे १० दिवस उलटून देखील जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आंदोलन स्थळी फिरकले नाहीत. उपोषणकर्ते यांची तब्येत खालावली गेली असून शुक्रवारी (ता.१५) त्यांचा नियोजित चोंडी दौरा रद्द झाल्याचे समजताच धनगर समाजाच्या युवकांनी आक्रमक पवित्रा घेत नगर-सोलापूर महामार्गावर चापडगाव ठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारला धनगर आरक्षणाबाबत तात्काळ वटहुकूम काढत समाजास न्याय द्यावा. अन्यथा पुढील निवडणुकीत त्यांना समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.



