
कर्जत: कर्जत (Karjat) शहरात आणि तालुक्यातील बहुतांश भागात आज (ता.१४) श्रावणी बैलपोळा (bailpola) उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा अल्प पावसाने दुष्काळाचे सावट, वाढती महागाई आणि काही अंशी लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भावामुळे बाजारपेठेत (marketplace) शुकशुकाट जाणवला. मात्र, काही ठराविक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजासाठी मोठ्या आनंदाने खरेदी करीत बैलपोळा साजरा केला.
शहरातील कापरेवाडी वेस येथे सजवलेले सर्जा-राजा सर्वांचे लक्ष वेधत होते. यंदा मान्सून पावसाने चांगलीच दडी मारल्याने त्याचा परिणाम श्रावणी बैलपोळ्यावर जाणवला. बाजारपेठेत सर्जा-राजाच्या शृंगाराची दुकाने सजली गेली होती. मात्र पावसाचे अल्प प्रमाणाने दुष्काळाचे सावट, साहित्याचे वाढलेले दर यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे.
मात्र, अशा अवस्थेत देखील सकाळपासूनच लाडक्या सर्जा-राजास स्वच्छ पाण्याने अंघोळ घालीत त्यास रंगविण्यात आले होते. पाठीवर मखमली झुल, कानास गोंडा, शिंगास मोर पिसे, पायाला छमछम वाजणारे घुंगरांच्या आवाजाने वातावरण दुमदुमले होते. लाडक्या सर्जा आणि राजाला गुलालात तर काही पशुपालकांनी हळदीची उधळण करीत ढोल-ताशात वाजतगाजत बैलजोड्या कापरेवाडी वेशीत आणल्या. शेवटी पोळा फुटताच आपआपल्या घरी विधीवत पूजा करून सर्जा-राजास गोड घास भरविण्यात आला. यांत्रिकीकरण शेतीमुळे अगोदरच बैलजोडी नामशेष होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या बैलपोळ्यास बैल जोडी संख्या कमालीची घटली होती.