
नगर : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये आज (ता.१४) मोठी दुर्घटना (Accident) घडली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली एक नाव बागमती नदीत उलटून मोठा अपघात झाला. या नावेत ३४ विद्यार्थी होते. त्यापैकी १४ विद्यार्थी बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, भीषण दुर्घटना होऊनही, इथे मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा जास्त अवधी लागला. त्यामुळे मुजफ्फरपूरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा चढला.
मुजफ्फरपूरमध्ये आज सकाळी एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या नावेत ३४ विद्यार्थी होते. बागमती नदीतून जाताना अचानक नाव डळमळू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर ही नाव उलटली. या परिसरातील स्थानिक रहिवासी राकेश कुमार यांनी सांगितलं की, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवलं होतं. यामुळेच नदीच्या मध्ये पोहोचल्यानंतर बोट डळमळू लागली. यानंतर बोट अनियंत्रित होऊन उलटली.
नाविक आणि त्याच्या सहकाऱ्याने आधी काही मुलांना वाचवलं आहे. यानंतर स्थानिक लोकांनीही नदीत उडी घेतली आणि काही मुलांना बाहेर काढलं. उर्वरित बेपत्ता मुलांचा शोध सध्या सुरु आहे. या घटनेनंतर नदीकिनाऱ्यावरील मधुरपट्टी घाटाजवळ शेकडो नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र नदीकिनारी बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरु असल्याचे पाहायला मिळाले.