
कर्जत : अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांवर केलेल्या लाठीमार घटनेचा निषेधार्थ तसेच कोपर्डीच्या निर्भया हत्याकांड घटनेचा निकाल लागून देखील तिच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. दुष्काळ निवारण उपाययोजनेच्या मागणीसाठी कोपर्डी (Copardy) (ता.कर्जत) येथील ग्रामस्थ मंगळवारी (ता. ५) पासून भैरवनाथाच्या मंदिरासमोर भजन-कीर्तन करीत साखळी उपोषणास बसले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी रात्री कँडल मार्च (Candle March) काढत आपल्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
मराठा आरक्षण यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर अमानुषपणे पोलीस विभागाकडून लाठीचार्ज करण्यात आला. कोपर्डीच्या निर्भया हत्याकांडानंतर कोपर्डी गावातून मराठा समाज एकटावला. त्या ग्रामस्थांनी देखील पुन्हा मराठा आरक्षणासह, निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अंतरवाली सराटी घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी यासह कर्जत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून त्याच्या उपाययोजना कराव्या या मागणीसाठी मंगळवारपासून साखळी उपोषण करीत आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काल (बुधवारी) रात्री आंदोलकांनी ग्रामस्थांसह विद्यार्थिनींनी कँडल मार्च काढत समाजाला न्याय देण्याची विनंती सरकारकडे केली. वरील सर्व मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कोपर्डीच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. आज (गुरुवारी) सकाळी मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांशी कोपर्डीमध्ये जात त्यांची भेट घेत चर्चा केली. आंदोलनास आपला पाठिंबा देत तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली. यावेळी सरकारने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.