धरण : पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पेटण्याची

    171

    अकोले : तालुक्यातील कळंब, मन्याळे, ब्राह्मणवाडा व संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वर या ठिकाणच्या पाणी योजनांसाठी मुळा नदी (Mula River) वरील पिंपळगाव खांड धरणातून (Pimpalgaon Khand Dam) पाणी नेण्यास स्थानिक शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत लवकरच आंदोलन करण्याचा इशारा पिंपळगाव खांड धरण (Dam) ग्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

    पिंपळगाव खांड धरणातून जवळेबाळेश्वर आणि ब्राह्मणवाडा या ठिकाणच्या जलजीवन मिशन पाणी योजनांचे काम सुरू आहे. या पाणी योजनांसाठी पिंपळगाव खांड धरणातून थेट पाणी उचलण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र, या धरणातून या पाणी योजनांना थेट पाणी पुरवठा झाल्यास स्थानिक शेतकर्‍यांच्या पिण्याचा व शेतीचा पाणी प्रश्न बिकट होणार आहे. यामुळे धरणग्रस्त शेतकरी उघड्यावर पडतील आणि बाहेरगावच्या शेतकर्‍यांना पाणी देऊन स्थानिक शेतकर्‍यांचे शेती आणि पिण्याचे पाणी हिसकावून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला आहे.

    या धरणातून पाणी नेण्यास आमचा तीव्र विरोध असून धरणाच्या खालील बाजूस स्वतंत्र उद्भव तयार करून त्या स्वतंत्र उद्भवातून पाणी नेण्यास आमची हरकत नाही. मात्र, धरणातील पाणी साठ्यातून थेट पाणी उचलणे आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात शेतकर्‍यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीत शेतकर्‍यांनी पाणी उचलण्याला तीव्र विरोध केला आहे. या बैठकीस संजय साबळे, गौतम रोकडे, राहुल साबळे, निलेश गंभिरे, अतुल चौधरी, गणेश चौधरी, श्रीधर साबळे, भाऊसाहेब साबळे, अशोक डेरे आदींसह कोतूळ, पिंपळगाव खांड, बोरी, वाघापूर या परिसरातील शेतकरी उपस्थित होते. याबाबत लवकरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे बोरीचे माजी सरपंच संजय साबळे यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here