
नगर : ‘जी-२०’ समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ९ सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले आहे. त्यासाठी राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांचा देखील प्राईम मिनिस्टर ऑफ भारत (Prime Minister of Bharat) असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वाद पेटला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आशियान परिषदेसाठी आज (ता.६) इंडोनेशिया येथे जाणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. येथूनही इंडिया हा शब्द हटवण्यात आला आहे. या बैठकीत सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यावर चर्चा होणार आहे. यंदा या परिषदेचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहेत.
पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ म्हणजे भारताचे पंतप्रधान असा करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.५) रात्री भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली. आता संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये देखील संविधान दुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.



