
श्रीरामपूर : तालुक्यातील उंबरगाव (Umbargaon) येथील प्रत्येक कुटुंबाला एक कडूनिंबाचे रोप (Neem plant) देऊन वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुणे येथील श्री साई शास्ता सेवा संस्थेचे अध्यक्ष हरिकुमार यांच्या विशेष सहकार्याने, विश्वस्त दत्ता धालपे यांचे मार्गदर्शन आणि विशाल पोफळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सुप्रिया विराज राजे भोसले यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय आयुर्वेद शास्त्रात कडुनिंबाचे आरोग्यदायी अनेक गुणधर्म विषद केलेले आहेत. त्याला अनुसरून गावातील ५६८ कुटुंबांच्या दारात प्रत्येकी एक याप्रमाणे “एक कुटुंब, एक कडुनिंब” हा उपक्रम राबवून गावकऱ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मदत होईल तसेच त्यायोगे प्रचंड उष्णतेमुळे होणारी जमिनीची धूप कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे जाणीवपूर्वक हा उपक्रम हाती घेतला आहे.
या अभिनव वृक्षारोपणाचा शुभारंभ उंबरगाव येथील मारुतीच्या मंदिरात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय छल्लारे व प्रमुख अतिथी म्हणून श्रीनिवास बिहाणी होते. यावेळी बोलताना बिहाणी यांनी उंबरगावसारख्या छोट्या गावात ही स्तुत्य योजना राबविल्याबद्दल संयोजकांची प्रशंसा केली. तर अध्यक्षीय भाषणात छल्लारे यांनी दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे निंब सिटी- निंब टाऊन हे स्वप्न असल्याची आठवण करून दिली.
याप्रसंगी दत्ता ढालपे, राकेश न्याती, भगवान उपाध्ये, शशांक रासकर, आशिष धनवटे, निलेश नागले, नितीन भागडे,अनिल कोळसे, रणजित गांगुर्डे, ग्रामसेवक भाऊसाहेब ढुमणे, किसन इंगळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.