
नगर : नगर (Ahmednagar) शहरात कोयत्याचा धाक दाखवून व मारहाण करत दोघांना लुटणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक विजय मोढवे (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, ता. नगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध कोतवाली पोलीस घेत आहेत.
बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे १९ ऑगस्टला रात्री टेम्पो घेऊन जाणाऱ्या दोघांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक दाखवून टॅम्पो चालकाला लुटले. त्याच्याकडील ११ हजारांची रोख रक्कम आरोपींनी चोरून नेली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रस्ता लुटीचा गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेतील आरोपींबाबत कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, हा गुन्हा अभिषेक विजय मोढवे याने केला आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पुढील तपास करीत आहेत.




