
नगर : यंदाच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी (Teacher Award) शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. यात नगर जिल्ह्यातील लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार (जिल्हा परिषद शाळा (ZP School), जामखेड), मंगेश गुलाब कडलग (रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती काेंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय, राहुरी), नरेंद्र खंडू राठाेड (जिल्हा परिषद शाळा (ZP School), अकाेले), या शिक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.
समाजाची निःस्वार्थ भावनेने, निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत.
यंदाच्या पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार प्राथमिक प्रवर्गात ३७, माध्यमिक प्रवर्गात ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट गाइसाठी दोन असे एकूण १०८ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय १ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे.