
श्रीरामपूर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा (crime) दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना सांगून मारणे त्याचबरोबर त्यांचे मनोबल तुटेल, अशी वागणूक देणे ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (Mokka) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी करून पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडायला लागल्या, हे दुर्दैवी असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Ambedkar) यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आज जखमी मुलांची भेट घेतली. त्यानंतर हरेगाव येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद आंबेडकर, राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते फारूक शेख, उपाध्यक्ष दिशा शेख, अमित भुईंगल, राज्य समन्वय डॉ.अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष शरद खरात, विशाल कोळगे, तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, सुमित पडवळ, किशोर ठोकळे आदी उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, जखमींवर व्यवस्थित उपचार सुरू असले तरी त्यांना मानसोपचार तज्ञाकडून उपचाराची गरज आहे. धर्म जात बघण्यापेक्षा माणूस म्हणून माणसावर केलेल्या अत्याचाराचा समाजाच्या प्रत्येक घटकातून संताप व्यक्त होत गेला, ही सकारात्मक बाबा असून काही राजकीय मंडळी मात्र याला अपवाद आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात आरोपींच्या संपर्कात कोण कोण आले, याची यादी पोलिसांनी तयार करावी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले





