
नगर : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh khan) जवान (Jawan) या चित्रपटामधील ‘नॉट रमैया वस्तावैया’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनतारा यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे.
अनिरुद्ध रविचंदर, विशाल ददलानी आणि शिल्पा राव यांनी ‘नॉट रमैया वस्तावैया’ हे गाणं गायलं आहे. तर अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले. कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. ‘नॉट रमैया वस्तावैया’ या गाण्यात शाहरुख आणि नयनतारा यांचा रोमँटिक अंदाज देखील दिसत आहे. काही दिवसांपूर्वी याच चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ आणि ‘चलेया’ या दोन्ही गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
‘जवान’ या चित्रपटाचा ट्रेलर 31 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. या चित्रपटात शाहरुख आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सुनील ग्रोवर, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतही रिलीज केला जाणार आहे.




