
नगर : इंडिया टुडे-सी व्होटर मूड ऑफ द नेशन (India Today-CVoter Mood of the Nation survey) या संस्थेने केलेले एक सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात लोकसभेतील जागांच्या मुल्यांकनासह भारताच्या ३० मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यास सांगण्यात आले होतं. ज्यामध्ये एकूण १ लाख ३४ हजार ४८७ लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री निवडला. या सर्व्हेक्षणानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) हे सध्या भारताचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं आहे.
१५ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात लोकांना देशाचा सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तरात ४३ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना भारताचे नंबर १ मुख्यमंत्री म्हटलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसरं स्थान मिळालं आहे. या महिन्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की, १९ टक्के लोक केजरीवाल यांना लोकप्रिय मुख्यमंत्री मानतात. मात्र, याच प्रश्नावर जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता ४ टक्क्यांनी वाढली, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तीन टक्के कमी मतं मिळाली आहे.
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना एकूण ८.८ टक्के मतं मिळाली आहेत. तर, चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आहेत. त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे ३ टक्के मतांसह पाचव्या क्रमांकासवर सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र या यादीतील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झालेला नाही.





