
राहाता : आपल्या हातांनी लाडक्या भाऊरायाचे मनोभावे औक्षण करून हातावर पवित्र रेशमी धाग्याच्या बंधनात बांधणारा रक्षाबंधन (Rakshabandhan) सण राहात्यातील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात (Preetisudhaji Educational Complex) उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा व पांढरा ड्रेस परिधान करून आलेल्या बाल चिमुरड्यांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला होता.
प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे यांच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त भाऊ बहिणीच्या प्रेमाची हिंदी व मराठी गीते ध्वनिफितीवर ऐकवण्यात आली. शाळेमधील मुलींनी दोन दिवसांपूर्वीच मुलांच्या हातावर सुबक मेहंदी काढली. स्कूलमधील पाच ते सहा एकरांच्या लॉन्सवर रक्षाबंधनाचा हा सोहळा पार पडला.
रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला साजऱ्या झालेल्या या सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे यांनी सांगितले की, कालपरत्वे सणांचे महत्त्व बदलले. परंतु त्यातील मूळ भाव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. भावा बहिणीचे पवित्र नाते हे अनादी काळापासून जपले जात आहे. काळानुसार भाऊ व बहिण यांच्या परस्परांविषयीच्या जबाबदाऱ्या बदलत आहेत. नात्यातील या जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांची बालकांना शालेय वयात जाणीव व्हावी, यासाठी हे सण मुद्दामहून प्रीतिसुधाजी स्कूलमध्ये साजरे केले जात असतात.
प्रीतिसुधाजी स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे, उपाध्यक्षा सौ. स्नेहलता डांगे, कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, अशोक गाढवे, स्वाती धनवटे, सचिन गिते, रविकिरण पाटील, जनार्दन साबळे,प्रीतम तोरडमल,अश्विनी पवार,कविता गाडेकर, आस्मा शेख,वनिता गिते,उषा गायकवाड ,शुभांगी गाढवे आदी शिक्षकांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.




