
नगर ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांचा काल (शुक्रवारी) श्रीगोंदा व नगरचा दौरा होता. हा दौरा आटपून चाकण मार्गे मुंबईला रवाना झाले आणि या दरम्यान दौऱ्यात त्यांच्या सोबत असणारी संगमनेरची टीम चाकण येथून संगमनेरकडे परतीच्या प्रवासाला निघाली होती. त्यांना एका वाहनाला आग लागलेली दिसली. प्रसंगावधान राखत या टीमने प्रवाशांचे जीव वाचविले.
शुक्रवारी (ता. 25) संध्याकाळी 6.30 ची वेळ होती. रिमझिम पाऊस सुरू झाला होता. राजगुरुनगर बाह्यवळण रस्त्यावर एक प्रवाशी वाहनातून काही महिला अचानकपणे धावपळ करून खाली उतरताना आमदार थोरात यांचे स्वीय सहायक भास्कर खेमनर यांच्या पाहण्यात आल्या.
यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबवण्यास सांगितले. लगेचच त्यांच्यासह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले की, वाहनाच्या इंजिनला आग लागली आहे. वाहनाच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले आणि आगीच्या ज्वालाही सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या क्षणीच चालक अरूण जोंधळे, स्वीय सहायक भास्कर खेमनर, विशाल काळे व अंगरक्षक रमेश शिंदे यांनी आमदार थोरात यांच्या गाडीतील सर्व पाण्याच्या बाटल्या घेऊन पेटलेल्या गाडीकडे आग विझविण्यासाठी धाव घेतली. आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी आग विझवली. या कामी थोरातांच्या टीमला दोन मुस्लिम बांधवांचीही मोठी मदत झाली. त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या या ट्रॅव्हलमध्ये साधारण 25 ते 30 महिला होत्या, गाडीचे इंजिनची आग विझल्यानंतर सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंदअश्रू दिसून आले.



