दर्शना पवारचा खुनच, संशयाची सुई कोणावर? पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तपासासाठी रवाना

    217

    पुणे : राज्यात एमपीएससी परीक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवार (वय २६, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) हीचा मृतदेह संशयास्पद रित्या काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला होता. तिच्या मृत्यू प्रकरणी महत्वाची अपडेट पोलिसांना मिळाली आहे. दर्शना पवार या तरुणीचा खून झाल्याचे तिच्या पोस्टमोर्टम अहवालातून पुढे आली आहे. दर्शना पवारच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. दरम्यान, तिच्या खून प्रकरणी तिच्या मित्रावर संशयाची सुई असून पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच पथके रवाना केली आहे. तसेच अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ९ जून रोजी ती पुण्यात आली होती. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे होता. १२ जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला. तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली.

    दरम्यान, दर्शना पवार हिचा मृतदेह हा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला. ती आणि तिचा मित्र राहुल हे दोघे राजगड किल्यावर ट्रेकिंगला गेले. त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुल हा सध्या फरार आहे.

    सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हाॅटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून माहिती उपलब्ध झाली आहे. दर्शनाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. त्यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here