पोलीस खात्याला कलंक! तरीही डीएसपी गप्प का?
पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकार्यांना मोठ्या रुबाबात आदेश काढून कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये खळबळ उडवून द्यायची, या जुन्या प्रकाराला आता पोलीसही कंटाळले आहेत. पोलीस खात्यातलेच अधिकाली एसीबीच्या जाळ्यात अडकत असल्याने या खात्याला मोठा कलंक लागला आहे. मात्र जिल्ह्याचे डीएसपी अद्यापही गप्प का आहेत, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
त्याचं झालं असं, की औरंगाबाद – बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे आणि सहाय्यक फौजदार दिलवाले हे दि. २६ सप्टेंबर रोजी एसीबीच्या जाळ्यात अडकले. वाळू ठेकेदाराकडून पावणेपाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा या दोघाविरुध्द आरोप आहे. दरम्यान, वाळू वाहतुकीच्या प्रकरणात लासुर स्टेशनजवळील शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनसोडे यांना लाच स्विकारल्याप्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवसांतच पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील दोन कर्मचारी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडून ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आदेश काढून जाहीर केले होते, की यानंतर कोणताही अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकला तर त्याच्या वरिष्ठांना जबाबदार धरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येईल. मात्र बिडकीन प्रकरणात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप पर्यंत अधीक्षक पाटील यांनी कारवाई केल्याची माहिती समोर येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून नुसतेच आदेश काढून ‘कर्तबगारी’चा ‘फार्स’ का केला जातोय, अशी विचारणा पोलीस वर्तुळात केली जात आहे.





