पवारांनी शब्द पाळला : अहमदनगरसाठी पाठवली महत्त्वाची इंजेक्शन्स

922

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, खासगी रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये बेड शोधण्याची पाळी रुग्णांवर आली आहे. मध्यंतरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पवार यांनी जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स पाठविले आहेत. ते गरीब रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी संग्राम जगताप यांनी शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सरकारने तत्काळ पुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रेमडेसिवीरचा साठा नगरकरांसाठी पाठविला असून, तो गरजू रुग्णांना मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप यांनी इंजेक्शन्सचा साठा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या वेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भूपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here