कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 150 हून अधिक लशींवर जगभरात संशोधन आणि चाचणी सुरू आहे.
नवी दिल्ली – देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 65 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे. रविवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 75,829 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 940 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 65 लाख 49 हजारांवर पोहोचली आहे. याच दरम्यान आज कोरोना लस कधी येणार, देशात कोणाला सर्वप्रथम मिळणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 150 हून अधिक लसींवर जगभरात संशोधन आणि चाचणी सुरू आहे. रशियाच्या Sputnik V या लशीला ऑगस्टमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालाची संपूर्ण जगाला प्रतीक्षा आहे. भारतातदेखील कोरोना लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यांपैकी दोन लसी या भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ‘संडे संवाद’ या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देणार आहेत.