Lumpy Skin Disease : ठाणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जनावरं पॉझिटिव्ह

403

Lumpy Skin Disease In Thane : जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी आजाराचा ठाणे (Thane) जिल्ह्यात शिरकाव झालाय. अंबरनाथ (Ambernath) तालुक्यात 2 जनावरांचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपासून दुभती जनावरं आणि त्यातही विशेषतः गाय आणि बैल यांना लम्पी आजार होऊ लागलाय. एक प्रकारचा त्वचारोग असलेल्या या आजारात जनावरांना ताप येणं, अंगावर फोड येणं, सर्दी होणं आणि शेवटी न्यूमोनिया होणं अशी लक्षणं असतात. या आजाराने राज्यात आत्तापर्यंत 36 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचा शिरकाव आता ठाणे जिल्ह्यातही झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरच्या बबलू यादव यांच्या तबेल्यातील गायीच्या 2 वासरांना मागील काही दिवसांपासून लम्पीसदृश्य लक्षणं दिसत होती. तर अंबरनाथच्या एका नंदीबैलालाही तशी लक्षणं दिसत होती. त्यामुळं त्यांची टेस्ट केली असता लम्पी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

20 जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही लम्पीचा शिरकाव या दोन केससमुळे राज्यातल्या इतर 20 जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही लम्पीने शिरकाव केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं पशुसंवर्धन विभागानं बाधित जनावरांच्या 5 किमी परिघातील सर्व गोवंशांचं लसीकरण सुरू केलं आहे. लम्पी आजार हा मनुष्याला होत नसून गोचीड, माशा यांच्यामुळे फक्त गोवंश, म्हणजे गायी आणि बैलांनाच हा आजार होत असल्याचं पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. लक्ष्मण पवार यांनी सांगितलं आहे. लसीकरणासोबतच स्वच्छता हा या आजाराला टाळण्यासाठी एकमेव उपाय असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मृत्यूचं प्रमाण किती? या आजारात मृत्यूचं प्रमाण दीड टक्का इतकं आहे. हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होऊ शकत असल्यानं लम्पीबाधित जनावराला वेगळं ठेवावं, असंही डॉ. लक्ष्मण पवार यांनी सांगितलं. या आजारामुळे तबेला पालकांमध्ये धाकधूक असून या आजारासारखी लक्षणं आढळली, तर तातडीने जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here