आयएनएस विक्रांतचे अनावरण हे शिवरायांना अभिवादन, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले…

327

Indigenous Aircraft Carrier INS Vikrant : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (India Made Aircraft Carrier) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे उद्घाटन पार पडल्यानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत सामील झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. शिवरायांच्या राजमुद्रेपासून नौदलाच्या नव्या झेंड्यासाठी प्रेरणा घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे.

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी छत्रपती महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. या दोन्हींसाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा आणि मनापासून शुभेच्छा, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण- फडणवीसउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की, तिरंगा आणि राजमुद्रा…आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्याजागी आपल्या लाडक्या, जाणत्या राजाची, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातील नवी निशाणी स्थापित झाली! भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता. आज भारतीय नौदलाला नवा ध्वज प्राप्त झाला आणि त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे. सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव आज यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाला! जगभरातील शिवभक्त, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here