बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार
बीड : येथील महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.मिर्झा बेग यांच्या कारला पुण्याला जाताना अहमदनगरजवळ अपघात झाला.
यात एक तंत्रज्ञ जागीच ठार झाला तर दुसरा तंत्रज्ञ व खुद्द अध्यक्ष जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नगर-पुणे हायवेवर घडली.दिनेश धोंडरे असे मयत तंत्रज्ञाचे नाव आहे.
धाेंडरे हे बीड तालुक्यातील येळंबघाट आरोग्य केंद्रात कार्यरत होते. तसेच मॅग्मोचे अध्यक्ष डॉ.मिर्झा बेग हे राजुरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असून संजय धस हे मलेरिया विभागात कार्यरत आहेत.
डॉ.बेग यांच्या पाठिला गंभीर इजा झाली असून धस हे किरकोळ जखमी आहेत. मंगळवारी सकाळीच ते कामानिमित्त पुण्याला जात होते. रस्त्यात टायर फुटल्याने कारने पटली घेतली.
यात धोंडरे जागीच ठार झाले. तर जखमींना तात्काळ नगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
धस जिल्हा रूग्णालयात तर डॉ.बेग हे एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. ही माहिती समजताच मयत व जखमींच्या नातेवाईकांनी नगरला धाव घेतली.
बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते, नगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांच्याकडून जखमींना मदत केली जात आहे.