Aimim Invitation To Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी औरंगाबादेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता याच पार्श्वभूमीवर एमआएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. जलील आणि पोलीस आयुक्तांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. औरंगाबादमध्ये शांतता राखण्यासाठी काय करावं यावर ही चर्चा झाली असल्याचं जलील यांनी सांगितलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले आहेत की, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की, कोणताही सण साजरा करताना मिळून साजरा केला जातो. यासाठीच मी आज औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना भेटायला आलो होतो. आपल्या शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही काय मदत करावी यावर आज त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचं ते म्हणाले.
राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, ”राज ठाकरे औरंगाबादेत येणार आहेत, त्यांची सभा आहे. मला त्यांना इतकंच म्हणायचं आहे की 1 तारखेला तुमची सभा आहे. तुमची ही सभा रात्री 8 किंवा 8.30 वाजता सुरु होईल, त्याआधी तुम्ही आमच्यासोबत इफ्तार करण्यासाठी यावं, सर्व हिंदू-मुस्लिम भाऊ एकसोबत बसून इफ्तार केल्यास समाजात एक चांगला संदेश जाईल.” ते म्हणाले, इफ्तार निमंत्रण त्यांना माध्यमातून आम्ही दिलंय, ही आमची संस्कृती आहे ते आपले पाहुणे आहेत. आम्ही पोलिसांना सांगितले काही मदत लागत असेल तर आम्ही करू, मी स्वतः दिवाळी फराळला जातो. तर राज ठाकरे यांनी इफ्तारला यायला हरकत नाही.
एक टक्के लोक हिंसक प्रवृत्तीचे असतातते म्हणाले आहेत की, ”रमजान एक असा महिना असतो ज्याची मुस्लिम बांधव वर्षभर वाट पाहतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच धर्मीय लोकांना आपला कोणताही सण नीट साजरा करता आला नाही. अनेक व्यवसायिकांनी, दुकानदारांनी सण वार म्हणून माल भरून ठेवला आहे. यात सर्व धर्मीय व्यवसायिकांचा समावेश आहे. समाजातील 99 टक्के लोक हे शांतताप्रिय असतात, तर एक टक्के लोक हे हिंसक प्रवृत्तीचे असतात. औरंगाबादेत शांतता कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”