अवघ्या पाच रुपयांवरून खून, नगर शहरानजीक नागापूर एमआयडीसी येथे एक धक्कादायक घटना घडलेली असून भजे विक्री करताना तुम्ही प्लेटचा दर 20 रुपये का लावला ? यावरून भांडण सुरू झाल्यानंतर एका तरुणाला लोखंडी दांडक्याने मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना नागपूर एमआयडीसीतील सह्याद्री चौक येथे 26 तारखेला घडलेली आहे.
प्रवीण रमेश कांबळे ( वय 35 राहणार बोरुडे मळा अहमदनगर ) असे मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अमोल बाबासाहेब सोनवणे, अमोल भाऊसाहेब साळवे ( दोघेही राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर ) , पुरुषोत्तम कुमार गुप्ता, अरुण नारद शाह, संकेत विठ्ठल सोमवंशी ( राहणार नवनागापूर ) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत तर यातील एक आरोपी बाबासाहेब केरू गव्हाणे ( राहणार वडगाव गुप्ता) हा अद्यापपर्यंत फरार आहे.
मयत व्यक्तीची आई शोभा रमेश कांबळे यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मयत युवक हा एमआयडीसी इथे मोलमजुरीचे काम करत असायचा. तो आणि त्याचा मित्र अमोल बोर्डे हे दोघे दुपारी नवनागापूर येथे गजानन कॉलनीत असलेल्या रेणुका माता वडापाव सेंटरवर गेले होते. तिथे भज्याची प्लेट पंधरा रुपये ऐवजी 20 रुपये का लावली म्हणून प्रवीण याने त्यांना विचारणा केली त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे हाणामारीत रूपांतर झाले.
आरोपी अमोल बाबासाहेब सोनवणे उर्फ सोन्या फिटर याने त्याच्या पाच ते सहा साथीदारांना सोबत घेत प्रवीण याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रवीण याच्या मित्राने मध्यस्थी केली आणि वाद मिटला. प्रवीण आणि त्याचा मित्र पार्सल घेऊन तिथून निघून गेले मात्र पाठीमागून मोटारसायकलवर आरोपी पुन्हा आले आणि त्यांनी प्रवीण आणि त्याच्या मित्राला लोखंडी गजाने मारहाण केली. प्रवीण याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला.किरकोळ कारणावरून झालेल्या या वादानंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले असून मयत प्रवीण यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांवर भा द वि 302 341 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे करत आहे.