Patra Chawl Land Scam: काय आहे पत्राचाळ घोटाळा? ज्यामध्ये ED ने संजय राऊत यांची मालमत्ता केली जप्त

377

Sanjay Raut Property Seize by ED: अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी मोठी कारवाई करत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25% शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

पीएमसी बँक घोटाळ्यात ही आलं होत नाव2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुरु आशिष कंपनीचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून 2010 साली संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात आले होते. या पैशातून संजय राऊत यांनी मुंबईतील दादर परिसरात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे.दरम्यान, ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश आहे. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीने यापूर्वी प्रवीण राऊत यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. प्रवीण राऊत, सारंग वाधवान, एचडीआयएलचे राकेश वाधवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन आणि इतरांची आरोपपत्रात नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here