नवी दिल्ली: पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशातील राष्ट्रीय राजकारणावर भाष्य केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील युतीबाबत प्रश्न विचारला असता, ‘कुठल्याही राजकीय पक्षांशी युती करण्यात रस नाही. आम्ही 130 कोटी भारतीयांशी युती करू इच्छितो’, असे केजरीवाल म्हणाले. तसेच, ‘द काश्मीर फाईल्स आणि पंतप्रधान मोदींवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
इंडिया टुडेशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘देशातील सामान्य माणसाने स्वतःचे भविष्य स्वतः ठरवावे, हे आमचे स्वप्न आहे. आपल्या देशात खूप टॅलेंट आहेत, त्यांना फक्त थोड्या पाठिंब्याची गरज आहे.’ यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर नौटंकी करत असल्याचा आरोपही केला. त्यांनी पुढे असा दावा केला की भाजप नेते नाखूश आहेत, कारण पक्षाचे केंद्रीय नेतृत्व द काश्मीर फाईल्सचा प्रचार करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत.
यावेळी केजरीवालांनी ‘द काश्मीर फाईल्स’वरही आपले मत व्यक्त केले आणि ‘द काश्मीर फाईल्स चित्रपटाची रक्कम काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी दान करावी’, असे म्हटले. ते पुढे म्हणाले की, ‘मी काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्या नाही. काश्मिरी पंडितांना चित्रपट नको आहे, त्यांना पुनर्वसन हवे आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘केंद्रात आमचे सरकार असते तर मी तुम्हाला (काश्मिरी पंडितांना) खात्री देतो की तुमच्यावर चित्रपट बनवण्याऐवजी तुमचा हात धरून तुम्हाला काश्मीरमधील तुमच्या घरी सोडले असते. यावेळी पीएम मोदींवर टोमणा मारण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी त्यांना (पीएम मोदी) टोमणा का मारेल? ते देशाचे पंतप्रधान आहोत. मी इथे भाजप, काँग्रेस, मोदीजी, सोनिया किंवा राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. मी फक्त देशाचा विचार करतो.’