पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी संपावर गेलेल्या एसटीच्या (ST) कर्मचाऱ्यांना शेवटची डेडलाईन दिली आहे. परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना (student) एसटीची गरज आहे. अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं. तसेच आपलं आपलं काम सुरू करावं. 31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्रं त्यांना वेगळी संधी मिळणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यता मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.
एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. अनिल परब यांनी काल समजूतदारपणे भूमिका घेतली. एसटी कामगारांना त्यांनी शेवटची संधी दिली आहे. एसटी कामगारांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे. त्यांची पगारवाढ केली आहे. पूर्वी पेक्षा त्यात साडेसातशे कोटी रुपये वर्षाला वाढ झाली आहे. कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जुन्नरची बिबट सफारी बारामतीला हलवलीय हे धादांत खोटे आहे. बारामतीचा प्रकल्प 2016 ला मंजुर झालेला आहे. तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. पण काहीजण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. पण काल मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो आहे. आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभाग आहे. वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरुय. ते झालं की अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन बिबट सफारीचे काम सुरु करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही व्यवस्थित अर्थसंकल्प सादर केलाय. हा असा म्हणाला आणि तुम्हाला काय म्हणायचंय यावर उत्तर देणं हाच धंदा मला नाही. अधिवेशनाच्या आधी खूप काही बोललं गेलं की असं होईल, तसं होईल. पण मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे तोपर्यंत हे सरकार चालणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही संपूर्ण पोलीस दलाला सुविधा देत आहोत. तर पोलीसांनी देखील त्यांच काम चोख करायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.





