“सीमेवरून सैन्य हटवा, तरच पुढे चर्चा होईल”, अजित डोवालांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टच सांगितलं

374

नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल  (National Security Adviser Ajit Doval) यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (Line of Actual Control -LAC) हटवले जाणार नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकत नाही.

दीड तास चाललेल्या बैठकीत भारताने सीमाभागातील उर्वरित भागात तातडीने आणि पूर्णपणे चिनी सैन्य मागे घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे, जेणेकरून द्विपक्षीय संबंध योग्य मार्गावर येऊ शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक, लष्करी पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. अजित डोवाल यांनी वांग यी यांना ही कारवाई समान आणि परस्पर सुरक्षिततेच्या भावनेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. 

याचबरोबर, एकाच दिशेने काम करा आणि तोडगा न निघालेल्या मुद्द्यांवर लवकरात लवकर निर्णया घ्यावा, असे अजित डोवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, चर्चा पुढे नेण्यासाठी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. यावर डोभाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर चीनला भेट देऊ शकतो असे सांगितले. तसेच, सध्याची परिस्थिती कोणाच्याही हिताची नाही आणि शांतताच एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करेल, असेही अजित डोवाल  म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here