लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर पार पडला. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील मान्यवरांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजप सरकारचा शपथविधी सोहळा सुरू आहे. योगी सरकारमध्ये केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ब्रजेश पाठक हे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.
दरम्यान, गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.