Umar Khalid : विद्यार्थी नेता उमर खालिदला दिल्ली सत्र न्यायालयाने धक्का दिला आहे. दिल्ली दंगल प्रकरणी उमर खालिदचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. उमर खालिदवर दंगलीचा कट रचल्याप्रकरणी आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
उमर खालिदच्या जामीन याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली होती. जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने गुरुवारपर्यंत टाळला होता. त्यानंतर कोर्टाने आज निकाल सुनावला. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश अमिताभ रावत यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला.
जामीन अर्जावरील सुनावणीच्या दरम्यान, सरकारी पक्षाकडे उमरविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला. तर, आरोपीकडून CAA आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांचा वापर हा शेळींच्या चाऱ्याप्रमाणे केला गेला. CAA विरोधी आंदोलन हे मुख्यत: गरीब वस्त्यांजवळ आणि दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी करण्यात आले असल्याचा मुद्दा सरकारी वकिलांनी मांडला.
उमर खालिदसह अन्य लोकांविरोधात फेब्रुवारी 2020 रोजी दिल्लीत दंगल घडवल्याचा आरोप आहे. उमर व इतरांनी या दंगलीचा कट आखल्याचा ठपका त्यांच्याविरोधात ठेवण्यात आल्याने दहशतवादविरोधी कायद्यानुसार (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली दंगलीत 53 जण ठार झाले होते. तर, 700 हून अधिक जखमी झाले होते. या दंगलीच्या माध्यमातून देशात उमरला अराजकता फैलावण्याचा आरोप उमरवर आहे.