PM मोदींच्या युट्युब चॅनलवरुन किती कमाई होते? पीएमओ का माहिती देत नाही? काँग्रेसचा रोकडा सवाल  

379

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस सोडत नसल्याचे दिसून येत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब चॅनलसंदर्भात माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांचे सुपुत्र कार्तिकेय चिदंबरम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, या मुद्द्यावर संसदेत बोलू न दिल्याचा दावा कार्तिकेय चिदंबरम यांनी केला आहे.

खासदार कार्तिकेय चिदंबरम यांनी पीएमओच्या यूट्यूबर चॅनेलवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सरकार असे का वागत आहे, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. चिदंबरम यांनी आपल्या पोस्टमध्ये चॅनलवर जाहिराती चालवण्यास परवानगी आहे का? यातून कमाई होते का?, काही महसूल निर्माण झाला का? त्यांची स्क्रीनिंग होते का?, असे रोकडे सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून चिदंबरम यांनी विचारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलबाबत त्यांचा प्रश्न भारत सरकारचा विषय नसल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आला आहे. पीएमओच्या अधिकृत वाहिनीची सरकारला पर्वा नाही हे आश्चर्यकारक आहे, असे चिदंबरम यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा यूट्यूब चॅनल Narendra Modi या नावाने आहे. २६ ऑक्टोबर २००७ रोजी नरेंद्र मोदी यांचे यूट्यूब खाते सुरु केलं होतं. मात्र, चार वर्षांनंतर १८ मार्च २०११ रोजी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ गुजरातच्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पातील आहे. या व्हिडीओला ३५,३७५ व्ह्यूज मिळाले होते. तर १४०० लाईक्स मिळाले आहेत. तेव्हापासून त्यांच्या चॅनलवर व्हिडीओ अपलोड होत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या या चॅनलवरून पीएमओ इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि एक्झाम वॉरियर्स मंत्राज या यूट्यूब चॅनेलचा प्रचारही करतात. त्यांच्या चॅनलवर सरकारशी संबंधित योजना, थेट कार्यक्रमही दाखवतात. नरेंद्र मोदींच्या चॅनलचा सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांगाचा आहे. १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मोदी एका तरुणाला भेटत आहेत. तरुण मोदींशी बोलतात आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. हा व्हिडिओ काशीचा आहे. हा १९ फेब्रुवारी २०१९ रोजी अपलोड केले होता. त्याला ७ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ११ लाख लाईक्स मिळाले आहेत.

दुसरीकडे, पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलच्या सब्सक्राइबर्सची संख्या एक कोटींहून अधिक आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे यूट्यूबवर ५.२५ लाख फॉलोअर्स आहेत. शशी थरूर हे देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात पण त्यांना फक्त ४.३९ लाख लोक फॉलो करतात. अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पीएम मोदींच्या फॉलोअर्सची जागतिक नेत्यांशी तुलना केल्यास ही संख्या आश्चर्यकारक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे यूट्यूबवर सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ३६ लाखांहून अधिक लोक ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना फॉलो करतात. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना ३०.७ लाख लोकं आणि इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना २८.८ लाख लोक यूट्यूबवर फॉलो करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here