मुंबई – नुकताच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल 10 मार्च रोजी जाहीर झाले आहे. या पाचही राज्यातील निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आतातर काँग्रेसमधूनच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वोच्च समितीची रविवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. CWC ची ही बैठक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
पाच राज्यांतील काँग्रेसचा दारूण पराभव पाहता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहेत, परंतु नेतृत्वाबाबत वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर त्या वेळेपूर्वी होऊ शकतात, असे मानले जात आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला फारसे काही करता आलेले नाही, तर पंजाबमध्ये खराब कामगिरीने सत्ता गमवावी लागली आहे.
काँग्रेसच्या पराभवानंतर केरळचे खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधीच नेतृत्व बदलांची मागणी केली आहे. मात्र, कर्नाटकातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि डीके शिवकुमार यांनी गांधी कुटुंबावर विश्वास व्यक्त केला आहे. पराभवानंतर यूपी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, यूपी काँग्रेसचे इलेक्ट्रॉनिक मीडिया समन्वयक झीशान हैदर यांची नेतृत्वाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.











