नगर तालुका पोलिसांनी बनावट नेव्ही अधिकारी आरोपीला कल्याण येथून केली अटक

365

अहमदनगर – भारतीय नौदलात (नेव्ही) नोकरीला लावून देतो, असे म्हणत तरूणाची एक लाख 50 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश बाबासाहेब घुगे (रा. कल्याण पश्‍चिम, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे ,पोलीस नाईक संभाजी बोराडे ,पोलीस नाईक राहुल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले यांच्या पथकाने आरोपीला कल्याण येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

याप्रकरणी अंकुश भाऊसाहेब टकले (वय 32 रा. भोयरे पठार ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश टकले व गणेश घुगे यांची मुंबईमध्ये ओळख झाली होती. मी भारतीय नौदलात नोकरीला असल्याचे घुगे याने टकले यांना सांगितले होते. टकले यांनी घुगे यांच्याकडे नेव्ही भरतीसाठी विचारणा केली. तेव्हा घुगे म्हणाला, ‘माझी नव्हीमध्ये खूप ओळख आहे. भरतीसाठी साडेपाच लाख रूपये द्यावे लागतील. सुरूवातीला दोन लाख व नियुक्ती झाल्यानंतर बाकीचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यानुसार टकले यांनी 13 फेब्रुवारी 2021 रोजी एक लाख आणि 15 फेब्रुवारी 2021 रोजी 50 हजार रूपये घुगे याला फोन-पे केले. 29 ऑक्टोबर 2021 रोजी टकले यांच्या मेलवर नियुक्त होऊन हजर होण्यासंदर्भात एक पत्र आले होते. 2 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौदलात आय. एन. एस. चिल्का, ओरीसा येथे हजर होण्याबाबत त्यामध्ये नमूद केले होते. टकले यांनी याबाबत नेव्हीच्या मुंबई येथील कार्यालयात या नियुक्त पत्राबाबत खात्री केली असता सदरचे नियुक्ती पत्र खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाली असल्याचे टकले यांच्या लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अनेकांच्या फसवणूकीची शक्यता

घुगे याला अटक करण्यात आली असून त्याने आणखी किती जणांकडून पैसे घेतले याचा तपास नगर तालुका पोलिसांनी सुरू केला आहे. आपण भारतीय नौदलात अधिकारी असल्याचे भासवून त्याने अनेकांकडून पैसे घेतल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस कोठडीत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने किती तरूणांची फसवणूक केली, याविषयी माहिती समोर येईल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे ,पोलीस नाईक संभाजी बोराडे ,पोलीस नाईक राहुल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले आदींच्या पथकाने अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे करत आहे. आरोपी घुगे याला कल्याण येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here