अहमदनगर – एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडील दोन लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेला तोफखाना पोलिसांनी अटक केली. सुमित्रा रमेश छेन्दी (वय ३८ रा. चिचोंडी पाटील ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिप्ती भास्कर लांडे (वय २१ रा. पद्मानगर, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी दिप्ती लांडे या ७ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदनगरकडे येण्यासाठी शिर्डी-दौंड या एसटी बसमध्ये राहुरी येथून बसल्या होत्या. बसमध्ये त्यांच्या शेजारी अनोळखी तीन महिला बसल्या होत्या.
त्यांनी दिप्ती लांडे यांचे लक्ष विचलित करून दिप्ती यांच्याकडील स्टिलच्या – डब्ब्यात ठेवलेले सोन्याचे गंठण, शाहीहार, झुबे, ठुशी असे दोन लाख. १३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. दिप्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखान्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करीत आहेत. सदरचा गुन्हा सुमित्रा छेन्दी या महिलेने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.










