पाथर्डी – दुचाकी मोटासायकलच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन महिनाभरापूर्वीच घेतलेली नवी कोरी दुचाकी गाडी जळून खाक झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील आगसखांड गावच्या शिवारात घडली आहे.
पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील खंडू रामनाथ फुंदे नेहमीप्रमाणे पाथर्डीतून बजाज प्लॅटिना गाडी घेऊन फुंदेटाकळी या त्यांच्या गावाकडे सपत्नीक जात असताना आगसखांड गावच्या शिवारामध्ये एका पुलाजवळ कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर अचानकपणे गाडीच्या वायरिंगमध्ये स्पार्क झाला. क्षणात आगीचा भडका उडून गाडीने पेट घेतला.
मात्र, यात फुंदे यांना सुदैवाने कोणतीही गंभीर इजा झाली नाही. गाडी सुरू असताना इंजीनमधून गरम काहीतरी लागत आहे हे कळल्यानंतर दाम्पत्य यांनी गाडी बाजूला सोडली. यावेळी काही क्षणात गाडीने पेट घेतला. फुंदे यांनी याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.











