नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्च नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. क्रूड ऑइल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे. युरोपच्या एकूण मागणीपैकी एकूण 35 टक्के पुरवठा हा रशियाकडून होतो. भारतालादेखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. युद्धाचा परिणाम हा या सप्लाय चेनवर होणार असून आगामी काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
2014 नंतर पहिल्यांदा विक्रमी किंमतकच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये 2014 नंतर पहिल्यांदाच विक्रमी वाढ झाली असून ही किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल इतकी झाली आहे.
निवडणुकीचा परिणामदेशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 7 मार्च रोजी होणार असून पाच राज्यांच्या मतमोजणीचा निकाल 10 मार्चला जाहीर करण्यात येणार आहे. या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. आता निकालानंतर यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






