मुंबईःरशिया आणि युक्रेनचे युद्ध आता भयंकरतेच्या पातळीवर जाऊन पोहचले आहे. रशियाकडून युक्रेनच्या (Russia-Ukraine) राजधानीवर सतत हल्ले केले जात आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले आहे त्या त्या ठिकाणी प्रचंड धुमचक्री आणि गोळीबार सुरु आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे. जेव्हा परवाच्या रात्री सगळं जग झोपेच्या आधीन होतं त्यावेळी रशियाकडून युक्रेनच्या राजधानी कीवसह (Capital Kyiv) अन्य शहरावर क्षेपणास्त्रांच्या (Missile) हल्ले केले जात होते. आणि या हल्ल्यातून वाचण्यासाठी युक्रेनमधील नागरिक जीवाच्या आकांताने सैरभैर धावत होते.
हा हल्ला सुरु झाल्यानंतर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा आठवण सांगताना म्हणतात की, 1941 मध्ये जेव्हा जर्मनीतील नाझीवाद्यांकडून असे हल्ले केले गेले त्यावळी त्यांचा पराभव युक्रेनने केला होता, आणि आताही या वाईट गोष्टींचा पराभव युक्रेनकडून नक्की केला जाईल असा विश्वास दिमित्रो कुलेबा यांनी व्यक्त केला आहे.
या युद्धकाळात युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हताश असल्याचे दिसत आहे. ते हताशपणे सोशल मीडियाचा वापर करत आपल्या देशातील नागरिकाना बळ देण्याचे काम करत आहेत. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करुन सैनिक आणि देशातील सामान्य नागरिकांना या संकटाला धैर्याने सामोरे जाऊ या म्हणत ते धीर देत आहेत. या युद्धात युक्रेन लढत राहणार आणि तो हारही मानणार नाही असा संदेश ते सोशल मीडियावरुन देत आहेत.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, रशियाने पहिल्यांदा मला टार्गेट केले आहे आणि दुसरा क्रमांकावर माझे कुटुंबीय आहेत. त्यामुळे या युद्धात युक्रेनच्या नागरिकांनी सहभागी व्हावे असा संदेश त्यांनी दिला आहे. युक्रेनच्या नागरिकांनी देश सोडून जाऊ नये, त्यामुळे 18-60 या वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना देशाचे संरक्षण करायचे आहे, त्यांनी या लढ्यात सहभागी व्हा आणि लढा द्या, त्यासाठी सरकार तुम्हाला शस्त्रे पुरवत आहे.
तर झेलेन्स्कींनी दुसर्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, रशियाने अखंड युक्रेनवर हल्ला करुन संरक्षण दलाला आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य बनवले आहे. यावेळी त्यांनी नाटो (NATO नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन), EU (युरोपियन युनियन) आणि अमेरिकेकडून झालेल्या फसवणुकीची गोष्टही त्यांनी सांगितली आहे. गेल्या काही दिवसांपासून जी अमेरिका मदतीची घोषणा करत होती, ज्यांनी सांगितले तुमच्या सीमारेषेवर लाखो रशियन सैनिक तैनात केले गेले आहे, आणि ते तुमच्यावर कधीही हल्ला करु शकेल असं फक्त हे सांगत राहिले मात्र काही केले नाही, हातावर हात ठेऊन शांत बघत बसले. एक प्रकारे ही या पाश्चिमात्य राष्ट्रांनी युक्रेनवर फक्त अश्वासनांची खैरात केली आहे, आणि ज्या वेळी युक्रेन युद्ध संकटात सापडला त्यावेळी या पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्याला एकटे सोडून दिले आहे.
रशियाकडून होत असलेल्या सततच्या हल्लामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, जेव्हापासून रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला तेव्हापासून माझा देश युक्रेन हा एकटा लढत आहे. जगात सगळ्यात बलाढ्य असणाऱ्या शक्तीही आमच्यापासून दूर गेल्या आहेत.





