अहमदनगर – लालटाकी परिसरात २०१९ मध्ये किरकोळ वादातून झालेल्या हत्याकांडामध्ये फरार असलेल्या आरोपीला अहमदनगर गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे.
या प्रकरणात माया वसंत शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करत असताना या प्रकरणात आरोपी असलेला संतोष भारस्कर हा पाथर्डी मध्ये असल्याची खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. या बातमीवरून अनिल कटके यांनी आरोपीची खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकातील सफौ/ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाने, पोना/ भिमराज खसें, देवेंद्र शेलार अशांनी मिळून बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीस शिताफीने ताब्यात घेवून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
प्रकरण काय
फिर्यादी माया वसंत शिरसाठ ( वय ३५, रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) यांची बहिण भारती दिपक आव्हाड,( रा. पाथर्डी ) व फिर्यादी यांचे शेजारी राहणारे सारीका संतोष भारस्कर यांचे नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती.
त्या कारणावरुन दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी दुपारचे वेळी सारीका संतोष भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन विक्रम दिनकर, विक्रम लहानू दिनकर, मुकेश विष्णू दिनकर व इतर १४ ते १५ आरोपींनी फिर्यादी माया शिरसाठ यांना तसेच त्यांची सासु बेबी अर्जून शिरसाठ, दिर सचिन शिरसाठ, विनोद शिरसाठ, संतोष शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकू, तलवारी या हत्यारांनी मारहाण करुन जखमी करुन फिर्यादी यांची सासु बेबी अर्जून शिरसाठ यांची हत्या केली होती.