पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; आता या तारखे पर्यंत करता येणार अर्ज

391

अहमदनगर – अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली.

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता, निर्वाह भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर ( https://mahadbtmahait.gov.in/Home/Index) अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.

सन २०१८-१९ किंवा त्यानंतर सदरच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेला असल्यास त्याच आधारबेस युजर आयडीने सन २०२१-२२ या वर्षातील नुतनीकरणाचा अर्ज भरावा. तर यापूर्वी अर्ज भरलेला नसल्यास नवीन आधारबेस युजर आयडी तयार करून अर्ज भरण्यात यावा.

तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी देखील आपापल्या महाविद्यालयात प्रवेशीत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्याचे विविध योजनांचे अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. दि. २८ फेब्रुवारी २०२२ या अंतिम मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन ही श्री.देवढे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here