महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काय म्हणाले?

543

अलिबाग: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (corona) घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि (mask free) कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मास्क काढण्याबाबतच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मास्कवर भाष्य केलं.

कोरोनाची साथ शिखरावर असतांना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील. पण आता लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे. लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अपघातग्रस्त भागात ट्रॉमा केअर सेंटर उभे करत आहोत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. ज्यांचे या रुग्णालय उभारणीस सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद. रुग्णालय इमारत लवकरात लवकर बांधून हे रुग्णालय सुरु होईल हे पाहिले जावे, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या दोन वर्षात रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पीटलचे उदघाटन, श्रेणीवर्धनाचे जास्तीत जास्त काम महाराष्ट्रात झाले. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली. छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयी सुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालय उभे करत आहोत. मागण्या अनेक असतात. नुसत्या मागण्या करून काही होत नाही, त्याच्या पुर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. आदिती तटकरे यांनी याचा खूप पाठपुरावा केला, असं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here