मुंबई- देशात होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्या विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. यातच आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
पाच राज्यांतील निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तथापि भाजपाकडे 145 आमदारांचे संख्याबळ होत नाही तोपर्यंत सत्ताबदलाची शक्यता नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे सत्तेवर राहणार. असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल. असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी म्हटले होते.











