मुंबई- पंजाब निवडणुकीत ड्रग्ज हा विषय खूप मोठा आहे. राज्यात आत्तापर्यंत तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त प्रमाणात ४ हजार किलो ड्रग्ज पकडले गेले आहे. निवडणूक आयोगाकडून पंजाब उच्च न्यायालयात या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.
पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयास सांगितले की, ६ फेब्रुवारी पर्यंत ३१२ कोटी रुपयांचे किमान ३ हजार ९९९ किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच, यामध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने न्यायमूर्ती अजय तिवारी आणि न्यायमूर्ती पंकज जैन यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग यांना ‘ड्रग फ्री निवडणुका’ सुनिश्चित करण्यासाठी काय करत आहात? याबाबत नोटीस बजावली होती.