मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) 2022 च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षा काही ऑफलाईन तर काही ऑनलाईन घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला आहे. या परीक्षेचे विस्तृत परिपत्रक लवकरच जाहीर केले जाईल. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यानंतर होणाऱ्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
कशापद्धतीने परीक्षा विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार याबाबत विद्यापीठाने माहिती दिली आहे.
पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र 2 नियमित व बॅकलॉग परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1, 3 आणि 5 बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. सत्र 4 ची नियमित व बॅकलॉग परीक्षा ही ऑनलाईन घेण्यात येईल.
तसेच सत्र ६ च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या एकूण लसीकरणाची संख्या तसेच कोकणातील एस.टी. महामंडळाच्या संपाची परिस्थिती व कोविडची परिस्थिती विचारात घेऊन दिनांक 1 मार्च 2022 पर्यंत निर्णय घेण्यात येईल.
सत्र 2 व 4 नियमित व बॅकलॉग या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तसेच सत्र 1 व 3 बॅकलॉगच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येण्याऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्यूत्तर परीक्षा या 50 टक्के बहुपर्यायी प्रश्न व 50 टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.
व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र 1 ते 4 नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा सत्र 2 व 4 परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1 व 3 बॅकलॉग ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.तसेच विधी शाखेच्या सर्व परीक्षा नियमित व बॅकलॉग ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व उप परिसरे यांच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. 2022 च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेचे सविस्तर परिपत्रक परीक्षा विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.