मुंबई: १९८३ चा विश्वचषक भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. या विश्वविजेतेपदानंतर भारतीय क्रिकेटला कमालीची कलाटणी मिळाली आणि बघता बघता जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व प्रस्थापित झाले. मात्र, ज्यावेळी भारताने कपिलदेव यांच्या कर्णधारपदाखाली विश्वचषक पटकाविला. तेव्हा या यशाचा जल्लोष करण्यासाठी बीसीसीआयकडे पैसा नव्हता. अशा परिस्थितीत बीसीसीआयला मदतीचा हात दिला तो लतादीदींनी आणि विश्वविजेत्या प्रत्येक खेळाडूला त्यावेळी एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.
लॉर्ड्सच्या बाल्कनीवर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक हातात धरला होता. हा ऐतिहासिक विजय साजरा कसा करावा, असा यक्षप्रश्न त्यावेळी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष व इंदिरा गांधी यांच्या सरकारचे मंत्री एन. के. पी. साळवे यांच्यासमोर होता. त्यावेळी क्रिकेटमध्ये आजच्याप्रमाणे पैसा नव्हता.
खेळाडूंना जेमतेम २० पाउंड दैनंदिन भत्ता मिळत होता. हा प्रश्न सोडवि ण्यासाठी साळवे यांनी राजसिंह डुंगरपूर यांना संपर्क केला आणि दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर लता मंगेशकर यांचा एक कॉन्सर्ट आयोजित करण्याची विनंती केली.
लतादीदींनी ती विनंती मान्य केली. दिल्लीत तुफान गर्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यातून जवळपास २० लाख रुपये गोळा झाले होते. तेव्हा कुठे खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. लतादीदींनी केलेली ही मदत बीसीसीआयने कायम स्मरणात ठेवली.
भारतातील प्रत्येक स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी त्यांच्यासाठी दोन व्हीआयपी पास राखीव ठेवले जात होते. अनेकदा लतादीदींनी बंधू हृदयनाथ यांच्यासोबत ब्रेबॉर्न स्टेडियमवर जाऊन सामने बघितले आहेत.
क्रीडाविश्वातून लतादीदींना श्रद्धांजली
लताजींच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःखी आहे. त्यांच्य सुमधुर गाण्यांनी करोडो लोकांची मने जिंकली आहेत. तुमच्या सर्व गाण्यांसाठी आणि तुम्ही दिलेल्या सर्व आठवणींसाठी आभार, लताजींचे कुटुंबीय आणि प्रियजनांच्या दुःखात मी सहभागी आहे. – विराट कोहली