Unlock In Delhi : देशात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध कमी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे दिल्लीत शाळा, महाविद्यालये आणि जीम उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कारमधून प्रवास करताना आपण एकटे असाल आणि मास्क घातला नसेल तर आपल्याला दंड आकारला जाणार नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
7 फेब्रुवारीपासून कॉलेज आणि कोचिंग इन्स्टिट्यूट नियमानुसार सुरू होतील. यामध्ये आता ऑनलाइन वर्ग होणार नाहीत.
टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या जातील. प्रथम 7 फेब्रुवारीपासून 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार आहेत. मात्र, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्गही सुरू राहणार आहेत.
14 फेब्रुवारीपासून नर्सरी ते आठवीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. या वर्गातील शिक्षकांनी संपूर्ण लसीकरण केले असेल तरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल.
दिल्लीत सध्या रात्रीचा कर्फ्यू सुरू राहणार आहे. मात्र, आता त्याची वेळ बदलून रात्री 11 ते पहाटे 5 अशी करण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. यापूर्वी त्यांना रात्री 10 वाजेपर्यंतच उघडण्यास परवानगी होती.
सर्व कार्यालये आता 100 टक्के क्षमतेने सुरू करता येतील. जिम, स्पा आणि स्विमिंग पूलही आता नियमांनुसार उघडता येणार कारमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करत असेल तर त्याला मास्क घालण्याची गरज नाही, त्याला सूट देण्यात आली आहे.
डीडीएमएच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात मनीष सिसोदिया म्हणाले की, आता दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांचा रोजगार सुरू राहावा आणि लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी सरकारने आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.



