SSC HSC Board Exam : ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

356

पुणे : दहावी (SSC Board) आणि बारावीच्या (HSC Board) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे लसीकरण अनिवार्य नसेल.

बारावीची लेखी परिक्षा 4 मार्च ते  30 मार्च दरम्यान ऑफलाईन होणार आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत दरम्यान घेण्यात येईल. कोरोनामुळे जे विद्यार्थी तोंडी किंवा लेखी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. 

दहावीची प्रॅक्टिकल आणि तोंडी परिक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान होणार आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे उशीरा घेण्यात येत आहेत. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.

यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. यावेळेस प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळेबाहेरचे शिक्षक बहिस्थ परीक्षक म्हणून नसतील तर, त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहिस्थ परीक्षक म्हणून काम करतील. मुख्य परिक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे. 

परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर, त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही. परिक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार असल्याचंही शिक्षण विभागाने सांगितलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here