पारनेर तालुक्यातल्या भाळवणीच्या वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातल्या सहाय्यक अभियंत्याला ४ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाऊसाहेब गोविंद पगारे असं त्याचं नाव असून अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
पारनेर तालुक्यातल्या जामगावच्या कैलास अण्णासाहेब शिंदे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पोल्ट्री फार्मच्या वीज कनेक्शनसाठी कोटेशन भरले होते. मात्र कोटेशन मंजूर होऊनही सहाय्यक अभियंता पगारे यांनी केवळ पैशासाठी त्यांना वीजमीटर दिले नाही.
त्यामुळे मीटरच्या मागणीसाठी कैलास शिंदे यांनी आज पगारे यांची भेट घेतली. त्यावेळी मीटर देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी पगारे यांनी शिंदे यांच्याकडे केली. परंतू हा व्यवहार ४ हजार रुपयांवर ठरला. तत्पूर्वी शिंदे यांनी अहमदनगरमधील लाचलुचपत विभागाला ही माहिती दिली.
त्यानंतर एसीबीचे पथक भाळवणीच्या वीज वितरण उपकेंद्राच्या कार्यालयात दाखल झाले. आणि या पथकाने सहाय्यक अभियंता पगारे याला ४ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे
.