*बीड जिल्ह्यात १२ डब्ब्यांची पहिली रेल्वे धावणार; नगर ते आष्टी मार्गावर ५ स्टेशन स्वागतासाठी सज्ज
यामुळे नगर ते आष्टी आता दररोज प्रवास करता येणार आहे. ६१ किलोमीटर अंतरावर पाच रेल्वे स्टेशन सर्व सोयीसुविधेसह प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. १२ डब्याची पहिली प्रवाशी रेल्वे धावणार असल्याचे अहमदनगर रेल्वेचे कनिष्ठ अभियंता श्रीकेश मिना यांनी सांगितले.
जिल्ह्यात रेल्वे आली असली तरी पुढे बीड-परळी जाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.नगर रेल्वे स्टेशनपासून नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी,कडा, आष्टी ही पाच स्टेशन असणार आहेत. या ६१ किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गावर दिवसातुन एक वेळा नियमीत रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे ४ फेब्रुवारी रोजी धावणार असुन चार रेल्वे मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीड जिल्ह्याच्या खासदार डाॅ.प्रितम मुंडे, नगरचे खासदार डाॅ.संजय विखे हे ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत.
आष्टी सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागात नियमित रेल्वे धावणार असल्याने व्यापार, उद्योगाला चालना मिळणार आहे. त्याच बरोबर अनेक वर्षापासून रेल्वेने प्रवास करण्याचे आष्टी करांचे स्वप्न देखील साकार होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांत आनंद व्यक्त होताना दिसत आहे.आष्टी-बीड-परळी हे रेल्वे काम बाकी ४७ मोठे पुल, ७४ लहान पुल, ५२ रेल्वे ओव्हर ब्रीज, २४ रेल्वे अंडर ब्रीज, १७ स्टेशन इमारतीचे काम बाकी असुन हातोला, बावी, वेताळवाडी या गावात रेल्वे भूसंपादन होऊनही कामाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर १८२५ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादनाची आवश्यकता असून १६३४ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादन पूर्ण झाले आहे.