निकाल लागताच पाच मिनिटांत मुख्यमंत्री जाहीर करणार; गोवा काँग्रेसकडून स्पष्टीकरण 

304

पणजी : २०१७ साली मुख्यमंत्री कोण या शर्यतीत अडकून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यास विलंब केलेल्या काँग्रेसला आता शहाणपणा आलेला आहे. निकाल लागताच पाच मिनिटांत मुख्यमंत्री कोण ते जाहीर करु आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी दहा मिनिटांत राजभवनवर पोहोचू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी १७ जागांवर विजय मिळाला. भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सरकार स्थापनेसाठी दावा करु शकला नाही. कारण मुख्यमंत्रिपदाबाबत मतैक्य होत नव्हते. दिगंबर कामत, लुइझिन फालेरो, रवी नाईक, प्रतापसिंह राणे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. दिग्विजय सिंह हे तेव्हा काँग्रेसचे गोवा प्रभारी होते.

काँग्रेसला १७ जागा मिळाल्यानंतर अपक्ष रोहन खंवटे, प्रसाद गावकर यांनी पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. गोवा फॉरवर्ड व मगोपचे प्रत्येकी तीन आमदारही काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी अनुकूल होते. परंतु काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरेना आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनवर पत्र पाठवण्यास काँग्रेसने विलंब केला. हीच संधी साधून भाजपने दिवंगत मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून गोव्यात पाठवले आणि फॉरवर्ड व मगोप तसेच अपक्षाचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापन केले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस या वेळी दक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here